लोणी काळभोर : पुणे येथील साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील आठवडे बाजारात रॅली काढून डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या रोगांचे फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी (ता. २४) जनजागृती केली.
या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी नागरिकांना आरोग्यविषयक जणजागृती करून माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी ”हमने ठाना हे, डेंग्यू, मलेरिया मिटाना है!, आवाज उठाओ, डेंग्यू को जडसे मिटाओ! अशा घोषणा दिल्या. तसेच बदलत्या हवामानामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार बळावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा रोगापासून सतर्क राहावे. असे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांनी केले आहे.
पाणी तुंबल्यावर लेफ्टो, आजार होण्याची शक्यता असते. गॅस्ट्रो, कॉलरा, होऊ नये म्हणून दुषित पाणी पिऊ नये. पाणी उकळून प्यावे, डासांची उत्पती रोखण्यासाठी आपला परीसर स्वच्छ ठेवावा, उघडे पदार्थ खाऊ नयेत, पाणी साठवण्याची भांडी आठवडयातून एकदा रिकामी करावी.
एक दिवस कोरडा पाळावा, टाक्यांना घट्ट झाकण लावावे, पाण्याची डबकी आपल्या घराभोवती साचू देऊ नका, डासाची उत्पती साठलेल्या पाण्यात होत असल्याने सर्वांनी स्वतः बरोबरच आपला परीसरही स्वच्छ ठेवा. असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे.
दरम्यान, मानवी शरीराला आजार कसे होतात, त्यापासून बचाव कसा केला पाहिजे. त्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. नागरिकांनी शरीराची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा तरी केली पाहिजे. जेणेकरून त्यांना शरीरातील आजारांचे लवकर निदान होऊन उपचार घेता येतील.
या रॅलीमध्ये मध्ये साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या द्वितीय आणि चतुर्थ वर्षाच्या एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी प्राध्यापिका शोभा पाटील, सुप्रिया सोनवणे व नेहा बीटे व प्रगती आवरे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.