लहू चव्हाण
Mahabaleshvar ST Stand : पाचगणी, (सातारा) : एके काळी राज्यात उत्पन्नात आघाडीवर असणारे महाबळेश्वर आगार अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे समस्यांच्या गर्तेत आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. महाबळेश्वर आगारातून दर अर्ध्या तासाने धावणाऱ्या महाबळेश्वर – वाई बसच्या अनेक फेऱ्या प्रवाश्यांना कोणत्याही सुचना न देता रद्द करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराचा प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.(Mahabaleshvar ST Stand)
महाबळेश्वरला येणाऱ्यांना एसटी हेच एकमेव प्रवासाचे साधन.
महाबळेश्वर हा दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. महाबळेश्वर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण बाजार, शैक्षणिक, शासकीय कामांसाठी तालुक्यातील जनतेची येथे रोज ये- जा असते. ग्रामीण भागातून महाबळेश्वरला येणाऱ्यांना एसटी हेच एकमेव प्रवासाचे साधन आहे. सकाळी गावातून सुटणाऱ्या पहिल्या गाडीने महाबळेश्वरला येऊन दिवसभर कामे करून संध्याकाळी मुक्कामाच्या गाडीने घरी परत जायचे, असा नागरिकांचा दैनंदिन दिनक्रम असतो.(Mahabaleshvar ST Stand)
मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महाबळेश्वर आगाराच्या बेजबाबदार व बेफिकीर कारभाराने प्रवासी, नोकरदार व शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. बस स्थानकावर तासन्तास गाडीची वाट पाहावी लागत असल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. गाड्या वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना घरघर लागली असून, ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या तर रोजच नादुरुस्त होताना दिसतात. तसेच आंबेनळी घाट बंद असल्याचे कारण पुढे करत लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहत बसावे लागत आहे.(Mahabaleshvar ST Stand)
महाड- अक्कलकोट, रोहा- तुळजापूर, रोहा- कोल्हापूर, श्रीवर्धन -सातारा श्रीवर्धन – मिरज, रोहा- सातारा, खेड -स्वारगेट, गणपतीपुळे -पिपरी चिंचवड या हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या फेऱ्याही अनियमितपणे धावत असल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कायम उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाई शटल, तसेच मेढामार्गे सातारा जाणाऱ्या फेऱ्याही अनियमित धावताहेत. प्रवाशांना समाधानकारक सेवा द्यायला महाबळेश्वर आगार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पर्यटकांमधूनही बोलले जात आहे.(Mahabaleshvar ST Stand)
नागरिकांना किमान एक ते दीड तास बससाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अनमोल वेळेचा अपव्यय होत आहे. अनेक बसेस बंद असल्याने प्रवाशांना एका पायावर उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तर काहींना जास्तीचे पैसे देऊन खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.(Mahabaleshvar ST Stand)
दरम्यान, सर्वसामान्य नागरिक, वृध्द, लहान मुले, ग्रामीण भागातील विद्यार्थींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याचा एस.टी महामंडळाला विसर पडल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यात निर्माण झाले आहे.(Mahabaleshvar ST Stand)
सर्वसामान्यांच्या हाल अपेष्टा लक्षात घेऊन एस.टी महामंडळाने त्वरित बसचा तुटवडा दूर करून बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
याबाबत महाबळेश्वर बस्थानकाचे आगारप्रमुख वैभव कांबळे म्हणाले, “महाबळेश्वर आगारात पुर्वी ५५ गाड्या होत्या. दिवसेंदिवस गाड्या नादुरुस्त झाल्याने सध्या ३५ गाड्याच कार्यरत आहेत. आम्ही नवीन गाड्यांची प्रतिक्षा करतोय. गाड्यांची मागणी जास्त असून एस.टी. ची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत.”(Mahabaleshvar ST Stand)