गणेश सुळ
Farm News : केडगाव, (पुणे) : शहरी भागात झालेल्या पावसामुळे दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. पावसाच्या दडीनंतर सध्या पावसाने हळूहळू सुरुवात केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जुलै महिन्यात भीमा नदीपात्र दुथडी भरून वाहत असते, तर नदीला पूरदेखील येत असतो. मात्र यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने जुलै महिन्यात नदीपात्रातील पाण्याची पातळी चांगलीच खालावली आहे.(Farm News)
बागायती भागात जून महिन्यात उसाची लागण सुरू.
दौंड तालुक्यातील बागायती भागात जून महिन्यात उसाची लागण सुरू होते. यंदा पाऊस वेळेवर आला नाही. त्यामुळे काही शेतकर्यांनी नदी, विहीर व कूपनलिकांच्या पाण्यावर उसाची लागण केली. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडेल आणि उगवून आलेल्या उसाच्या लागणींना फायदा होईल; मात्र त्या वेळीदेखील पाऊस पडला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता.(Farm News)
पाण्याअभावी शेतकऱ्यांनी आपले हाता – तोंडाशी आलेली पिके अगदी कवडीमोल भावाने विकून किंवा तशीच सोडून द्यायची वेळ आली होती. ऊस पिकासाठी चांगला बाजारभाव असताना देखील पाण्याअभावी पूर्ण वाढ झालेली नसताना देखील कुट्टी साठी तोडावी लागली. परंतु जिल्ह्यातील डोंगर भागात व धरण क्षेत्रात गेली दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. मागील दीड ते पावणेदोन महिन्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे नद्यांची पाण्याची पातळीदेखील खालावली होती.(Farm News)
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात तसेच डोंगर भागात व सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने शेत पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे. गेली काही दिवसांपासून भीमा नदीपात्रातील पाणीपातळी हळूहळू कमी होत असल्याने या भागातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. अखेर दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केली आणि भीमा नदीपात्रातील पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.(Farm News)
दरम्यान, वाळकी, पिराची वाडी रांजणगाव, पारगाव अलेगाव या गावामध्ये आत्ता गेलेल्या उसाची पुन्हा नव्या जोमाने लागवड सुरू केली आहे. काही शेतकरी वर्गाने उशिरा का होईना बाजरी पेरणी चालू केली आहे. भीमा नदीच्या पाणी वाढीने नदीलागतच्या गावातील शेतकरी समाधानी झाला आहे.(Farm News)