Mumbai News : मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे डोंगर-दऱ्या हिरवाईने नटल्या आहेत. धबधबे कोसळू लागले आहेत. धबधबे, धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी तीन मुले गेली होती. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. तर एका ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आईवडिलांच्या डोळ्यांसमोरच घडल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. गेल्या आठवड्यातच या धरणात बुडून तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दोघांना वाचवण्यात यश!
दरम्यान, मुंबईत मार्वे बीचवर पाच जण बुडाल्याची आणि त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Mumbai News) विरार पूर्वेला फुलपाडा येथे महापालिकेचे पापडखिंड धरण आहे. रविवारी सुट्टी असल्याने वसंत बोराडे पत्नी, मुलगा तसेच शेजारील अन्य दोन मुलांसह पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते.
रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ओम बोराडे (वय ११) आणि त्याचे दोन मित्र अंश (वय १२) आणि वंश (वय ११) पाण्यात बुडू लागले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीनही मुले बुडू लागली. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात आल्यावर काही जणांनी या मुलांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. (Mumbai News) स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले. मात्र, ओम पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी रात्री ११ वाजता विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात याच धरणात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.
आपल्या डोळ्यादेखतच मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने बोराडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातच या धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. (Mumbai News) त्यानंतरही वसई विरार महापालिकेने सुरक्षारक्षक तैनात न केल्याने पुन्हा ही घटना घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पापडखिंड धरणाशेजारी नागरिक फिरायला येत असतात. या धरणाभोवती फिरण्यास व पोहोण्यास बंदी असतानाही अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने येथील भागात बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.