Kedarnath News : पुणे : उत्तर भारतात पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, पुरस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणार्या पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील वाळकी येथील मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेला ९ जुलैला निघाले होते. पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली आणि पुढचा प्रवास जागीच थांबला. रात्रीची वेळ असल्याने शासकीय मदत मिळण्यात अडथळे येत होते. अखेर भालसिंग आणि त्यांचे सहकारी मध्यरात्रीच कामाला लागले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल नऊ तास राबून त्यांनी कोसळलेली दरड आणि मोठे दगड बाजूला करून वाहतूकीसाठी रस्ता मोकळा केला… प्रसंगावधान राखून दाखविलेल्या तत्परतेमुळे भालसिंग आणि सहकाऱ्यांचे कौतूक होत असून, हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीचे वाघ धावल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. अनेक नद्यांना पूर आला असून, गावे पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.(Kedarnath News) दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.उत्तर भारतात पावसाचे थैमान सुरू असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सोनप्रयाग आणि गौरीकुंडमध्ये ही यात्रा स्थगित केली आहे. मंदाकिनी आणि अलकनंदा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या परिस्थितीत नगर तालुक्यातील वाळकी येथील मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेला ९ जुलै रोजी निघाले होते. वाटेत त्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. (Kedarnath News) पावसामुळे रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग मार्गामध्ये दरड कोसळली. यामध्ये भाविक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुढील प्रवासाचा मार्ग ठप्प झाला. रात्री उशिरा शासकीय मदत मिळत नसल्याने मनोज भालसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ तास अथक परिश्रम करून कोसळलेली दरड आणि मोठे दगड बाजूला सारून रस्ता मोकळा केला. स्थानिक पोलीस प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी मनोज भालसिंग व त्यांचे सहकारी दीपक बोठे, गणेश बोठे, राजेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.
दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांपैकी ५० टक्के पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे.