Pune News पुणे : चाकूचा धाक दाखवून दुकानदाराला लुटणाऱ्या एका सराईत गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Pune News) हा सराईत गुंड दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून दर महिना 5 हजार रुपये हप्ता आणि दररोज एक क्वार्टर देण्याची मागणी करुन दारुची बाटली घेऊन जायचा. (Pune News)
सुरज रोहिदास नलावडे (वय ३३, रा. गणेशनगर, शनी मारुती मंदिराजवळ, कोथरुड) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. याबाबत सतिश शंकरलाल मुलचंदानी (वय ४०, रा. वाकड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलीसांनी सराईताला अटक केली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज नलावडे हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर यापूर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. दारुच्या दुकानदारांना खंडणी मागायची, दारुची बाटली, चकना जबरदस्तीने घेऊन नदीपात्रात जाऊन दारु पित बसण्याची त्याची सवय आहे.
सुरज नलावडे हा मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास कर्वे रोडवरील कोहिनूर वाईन्समध्ये आला होता. फिर्यादी सतिश मुलचंदानी हे दुकानात होते. त्यावेळी सुरज याने फिर्यादी यांना दरमहा ५ हजार रुपये हप्ता द्यायचा व रोज एक क्वार्टर दारु द्यायची अशी मागणी केली. पण मूळचंदानी यांनी त्यास नकार दिला. तेव्हा त्यांना चाकूचा धाक दाखवून दुकान चालू देणार नाही, असे धमकावून एक दारूची बाटली जबरदस्तीने घेऊन गेला.
दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले व त्यांच्या सहकार्यांनी सुरज नलावडे याचा शोध घेतला. तेव्हा तो नदी पात्रात दारु पित बसला होता. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली.