पुणे : जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या बहुचर्चित ऑनलाइन बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. दोन दिवसात (शुक्रवारी आणि शनिवारी) जवळपास ३१ तासांत राज्यातील तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन आणि स्वयंचलित पद्धतीने आंतरजिल्हा बदली करण्यात आल्या आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, “या बदल्या या नि:पक्षपातीपणे पार पडल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही कमी असणार आहे. शिक्षकांनी या नव्या यंत्रणेनुसार त्यांच्या बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे. यासाठी आवशक्य ती सर्व प्रक्रिया त्यांनी पार पाडावी,”
या बदल्यांमद्धे सर्वात कमी बदल्या या नागपूर जिल्ह्यात झाल्या आहेत. या ठिकाणी केवळ ११ शिक्षक हे बदलीसाठी पात्र ठरले आहेत. तर सर्वाधिक शिक्षकांची बदली ही पालघर येथे झाली आहे. या ठिकाणी तब्बल ४७८ शिक्षकांची बदली करण्यात आली आहे.
या बदली प्रक्रियेसाठी ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयात नमूद केलेले नियम लागू करून सॉफ्टवेअर प्रणालीने प्रत्येक निर्णयाची गणना कशी केली यासाठी संपूर्ण लॉग तयार करण्यात आला होता. यादृच्छिक निवडलेल्या आणि नाकारलेल्या ५०० प्रकरणांचे नमुना लेखापरीक्षण देखील पूर्ण झाले आहे. सॉफ्टवेअर प्रणालीमुळे जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या साखळीमुळे मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात.
बदली आदेश प्रणालीमध्ये एनक्रिप्शन अंतर्गत लॉक ठेवण्यात आले आहेत. ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्याचे अनलॉक आणि प्रकाशन होणार आहे. निकाल प्रकाशित होताच, प्रत्येक शिक्षकाला ईमेलमध्ये द्वारे बदली ठिकाणी जाण्यासाठी ऑर्डर दिली जाणार आहे. हे ऑर्डर या नव्या सिस्टममध्ये लॉग इन करून डाउनलोड देखील करता येणार आहे. तोपर्यंत डेटा पाहणे अशक्य आहे.
बदलीचा आदेश मिळाल्या नंतर, त्या शिक्षकाला नवीन जिल्ह्यात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे लागणार आहे. हा निर्णय प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असेल. शिक्षण हक्क कायदा, २००९ च्या कलम २६ अन्वये – जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या १० टक्के पेक्षा जास्त जागा रिक्त असू शकत नाहीत.