जळगाव : माजी मंत्री, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज (शनिवारी) जळगाव जिल्ह्यात शिवसंवाद यात्रा होणार आहे. या यात्रेपूर्वीच काल (शुक्रवारी) मध्यरात्री काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या स्वागतार्थ धरणगावात लावलेले बॅनर फाडले. या घटनेमुळे धरणगावसह संपूर्ण जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे.
द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत फलक (बॅनर) फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटना उघडकीस येताच मध्यरात्री धरणगाव शहरात तणाव निर्माण झाला. काही शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
या प्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शनिवारी प्रत्यक्ष सभेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी दिली.
ठाकरेंचा ‘शिव संवाद’ यात्रेनिमित्त शनिवारी दुपारी एक वाजता धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ सभा आयोजित केली आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवासेनेकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावण्यात आले आहेत.
शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञात तरुणांनी शहरातील गणेशनगर, हेडगेवारनगर व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनर फाडले. जवळपास सहा ते सात ठिकाणीचे बॅनर फाडण्यात आले आहे
धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. फाडलेले बॅनर ताब्यात घेऊन तणाव शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.