Mumbai News : मुंबई : अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. दोन गटांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. याचा प्रत्यय आज आला. अजित पवार गटाकडून वापरलेल्या शरद पवारांच्या फोटोला खुद्द शरद पवारांनीच कडाडून विरोध केला आहे. जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा, हा माझा अधिकार आहे. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये, असा सज्जड दम शरद पवार यांनी भरला आहे.
जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा, हा माझा अधिकार
अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला. या प्रकारानंतर माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला, त्यांच्याशी माझा वैचारिक संघर्ष आहे. (Mumbai News) त्यांनी माझा फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर आता एकमेकांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. शपथ घेतलेल्या ९ आमदारांना अपात्र करावं, अशी नोटीस जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवली. तर दुसरीकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याची नोटीस अजित पवार यांनी पाठली. दुसरीकडे शरद पवार यांनीही प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबतचं पत्र शरद पवारांना लिहिलं होतं, त्यानंतर शरद पवारांनी ही कारवाई केली.
दरम्यान, अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्याची घोषणाही प्रफुल पटेल यांनी केली. जयंत पाटील यांच्याऐवजी सुनिल तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं प्रफुल पटेल यांनी जाहीर केलं. (Mumbai News) या सत्तानाट्यात सामान्य कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला आहे, अशी प्रतिक्रीया स्थानिक नेते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहेत.