पुणे : पीक कर्जाच्या व्याज सवलत परताव्याची रक्कम मिळावी, यासाठी पुणे जिल्हा बॅंकेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी हे पत्र पाठवले आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने वाटप केलेल्या पीक कर्जाच्या व्याज सवलत परताव्याची रक्कम अद्याप जिल्हा बॅंकेला आणि कोणत्याही शेतकऱ्याला मिळू शकली नाही, त्यामुळे हे पत्र बँकेने पाठवले आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या व्याज सवलत परताव्याची रक्कम पुणे जिल्हा बॅंक भरत असे आणि भरलेली ही रक्कम केंद्र सरकारकडून जिल्हा बॅंकेला मिळत असे. परंतु केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी व्याज सवलत परताव्याच्या फरकाची रक्कम ही जिल्हा बॅंकेला न देता, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला.
या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना केंद्र सरकारडून तीन टक्के व्याज सवलत परतावा दिला जाईल, असेही केंद्र सरकारने जाहीर केले होते. परंतु एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर ही व्याज सवलत परतावा रक्कम जमा होऊ शकली नसल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्यावतीने (पीडीसीसी) दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात मिळून तीन लाख रुपयांपर्यंतचे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले जाते. याचा पुणे जिल्ह्यातील २ लाख ८५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.