बारामती : खेळता खेळता ८ महिन्यांच्या बाळाने आईची जोडवी गिळल्याची धक्कादायक बातमी बारामतीत घडली आहे. यामुळे पालक घाबरले होते. परंतु, डॉ. सौरभ निंबाळकर हे देवदूत बनून आले आणि चिमुकल्याचे प्राण वाचविले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाने अचानक आईचे दूध पिणे बंद केले. त्यानंतर त्याच्या पालकांनाही चिंता वाटू लागली. त्यानंतर पालकांनी त्याला घेऊन शहरातील बालरोगतज्ज्ञांकडे धाव घेती. बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरव मुथा यांनी त्याच्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या. त्याच्या एक्स-रे रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला. बाळाच्या घशात जोडवे असल्याचे दिसले. हे ऐकूण बाळाच्या पालकांच्या पायाखालची जमीन हादरली.
दरम्यान, डॉ. सौरव मुथा यांनी तात्काळ बाळाला निंबाळकर हॉस्पिटलमध्ये पाठविले. डॉ. सौरभ निंबाळकर यांनी शस्त्रक्रिया करून दुर्बिणीद्वारे बाळाच्या घशात अडकलेले जोडवे अलगद बाहेर काढले. आणि बाळाला जीवदान दिले. त्यानंतर सर्वांच्याच जिवात जीव आला. आता बाळाची प्रकृती स्थिर आहे.