युनूस तांबोळी
Shirur News टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील बेट भागात घोडनदीवरील पुलांचे काम व रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत. टाकळी हाजी, फाकटे,कवठे येमाई, म्हसे, निघोज,आण्णापुर या सर्व भागांसाठी रस्ते व पूलांची कामे महत्वाची ठरली आहेत. (Shirur News) माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यांने बेट भागाचे दळणवळण आता वेगवान होणार असल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करू लागले आहेत. (Shirur News)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे घोडनदीवर पहिला पुल माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कार्यकाळात २० वर्षापुर्वी करण्यात आला होता. हा पुल अरुंद असुन त्यावरुन दुहेरी वाहतुक होत नसल्याने अनेक वेळा वाहतुक कोंडी होत होती. या परीसरात उस पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून येथुन भिमाशंकर, पराग, घोडगंगा, व्यंकटेशकृपा या साखर कारखाण्यांना मोठ्या प्रमाणात ऊस व पुणे मुंबई बाजार पेठेत फळे भाजीपाला वाहतुक होते. रस्त्यांची दुरावस्था व पूलाची आवश्यकता दळणवळणासाठी मोठी समस्या जाणवत होती.
यासाठी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे टाकळी हाजी सह, फाकटे – कवठे येमाई, व म्हसे – आण्णापुर येथे घोडनदीवर पुलांची मागणी केली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी कामांना मंजुरी दिली. त्यातून येथील पूलांचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय पाटील यांच्या मार्गदर्शना खाली काम सुरु आहे.
बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कुंभार, शाखा अभियंता नवनाथ शेळके यांनी ग्रामस्थांसह कामाची पाहणी केली. या वेळी घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, ठेकेदार दत्तात्रय लाळगे, मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, उदयोजक रामभाऊ गायकवाड, देविदास पवार, बन्सी खाडे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र गावडे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील व शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्ना मधुन घोडनदीवर कवठे येमाई-फाकटे पुल ( ९ कोटी ५० लक्ष ) व म्हसे आण्णापुर पुल – ( १० कोटी २५ लक्ष )येथे दोन पुल मंजुर झाले आहेत. तसेच मलठण, टाकळी हाजी, वडनेर रस्ता सुधारणा – ४ कोटी, माळवाडी भैरवनाथवाडी रस्ता सुधारणा – ३ कोटी ८० लाख, टाकळी हाजी – गावडे विद्यालय रस्ता रुंदीकरण – ३ कोटी रुपये मंजुर झाल्याने ही कामे प्रगती पथावर आहे. त्यामुळे या भागातील दळणवळण अधिक सुखकर होणार आहे.
याबाबत उपअभियंता संजय कुंभार म्हणाले की, पावसाळ्या पुर्वी टाकळी हाजी (घोडनदी ) वरील पुलांच्या स्लॅबचे काम पुर्ण होणार असुन महीनाभरात सर्व काम पुर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . इतर दोन्ही पुलांचे कामेही लवकर सुरु करण्यात येतील.