नारायणगाव, (पुणे) : हिवरे तर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात चार ते पाच दरोडेखोरांनी नागरिकांवर हल्ला करून सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (ता. १९) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Narayangoan News)
गणेश मुरलीधर भोर (वय ३९), त्यांची पत्नी प्रमिला गणेश भोर (वय ३५), आई रंजना मुरलीधर भोर (वय ६०), चुलते शंकर रभाजी भोर (वय ७५) हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यात त्यांच्या डोके, हात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या घटनेमुळे हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात शेतावर वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Narayangoan News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश भोर यांचा सातपुडा मळा शिवारात शेतात बंगला आहे. घरात यांच्यासह आठ सदस्य राहतात. सोमवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सदस्यांना वीट, दगड, काठी व कोयत्याने हल्ला चढविला. (Narayangoan News)
त्यानंतर कुऱ्हाड मानेवर ठेवून जीवे मारण्याची धमकी देऊन महिलांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. कपाट फोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा सुमारे सहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार विनोद दुर्वे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. (Narayangoan News)
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहे. (Narayangoan News)
दरम्यान, नारायणगाव पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या वीस गावा पैकी चौदा गावे बागायती क्षेत्रात येतात. या भागातील शेतकरी शेतावर वस्ती करून रहात आहेत. शेतकरी बिबट्यांची दहशतीखाली असतानाच दरोड्याची घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. (Narayangoan News)