सुरेश घाडगे
Paranda Accident परंडा : परंडा शहरात गुरुवार अपघात वार ठरला असून, शहरात गुरुवार (दि.15) दुपारी तीनच्या सुमारास अपघाताच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. (Paranda Accident) यामध्ये परंडा न्यायालयासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर सिना कोळेगाव प्रकल्प कार्यालयासमोर झालेल्या अपघातात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा उपचारादरम्यान मुत्यू झाला आहे. (Paranda Accident)
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील वडनेर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य रामा गुलाब गायकवाड यांच्या दुचाकीला परंडा न्यायालयासमोर मालवाहतूक टमटमची जोराची धडक बसली. यामध्ये रामा गायकवाड (वय 55) गंभीर जखमी झाले.
परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल
अपघातातील जखमींना उपचारासाठी परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या अपघातानंतर टमटम चालक पसार झाला. पोलिसांनी पंचनामा करून टमटम ताब्यात घेतला आहे. अपघाताची माहिती मिळताच वडनेरच्या ग्रामस्थांनी परंडा उपजिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.
तर अपघाताच्या दुसऱ्या घटनेत पाण्याचे जार वाहतूक करणारा टमटम परंडा-बार्शी रोडवरील सिना कोळेगाव कार्यालयाजवळ पलटी झाला. या अपघातात ओम दादासाहेब काळे (वय 14, रा.परंडा) हा शालेय विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या ओम याचा बार्शी येथे उपचारादरम्यान मुत्यू झाला. ओम काळे हा शहरातील सरस्वती शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. आज शाळेचा पहिलाच दिवस आणि या अपघातात ओमचा मृत्यू झाल्याने काळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.