Pimpri News पिंपरी – नोकरीसाठी बंगालवरुन आलेल्या तरुणीचा विनयभंग करीत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. (Pimpri News)
पश्चिम बंगालमधून आलेल्या एका 28 वर्षीय तरुणीने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांचे देखील नाव आहे. महेश्वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत तरुणीने म्हटले आहे की, ती कामाच्या शोधात होती. वेबसाइटवरुन तरुणीला एका महिलेचा नंबर मिळाला.
त्या महिलेने तरुणीला बॅंकेत नोकरीसाठी इंटरव्यू असल्याचे सांगत पुण्यात बोलविले. नंतर बॅंकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ठाकरे यांनी तिला भागीदार चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्वरी रेड्डी यांच्याशी ओळख करून दिली.
त्यानंतर ठाकरे यांना 15 हजार रुपये दिले. 15 मे रोजी आरोपींच्या पुण्यातील कार्यालयात बोलविले. तिथे ठाकरे यांनी विनयभंग केल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर मुख्य आरोपी रेड्डी याने वारंवार पुणे आणि पिंपरी येथील कार्यालयात विनयभंग केला. तर 3 जून रोजी पुण्यातील कार्यालयात बाथरूममध्ये जाऊन रेड्डी याने तिच्यावर अतिप्रसंग केला.
या प्रकारानंतर पीडित मुलगी जाऊ लागली असता महिला आरोपीने तिला अडविले. आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू देखील त्यांना खूश कर, असे सांगितले. त्यानंतर चिरागउद्दीन तिथे आला व त्याने पिस्टलाचा धाक दाखवून धमकावले.
4 जून रोजी रेड्डी याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे दाखविले. याबाबत बोलताना अर्जुन ठाकरे म्हणाले की, मी किंवा आमच्यापैकी कुणीही कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. केवळ पैसे उकळण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.