दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : ज्येष्ठ मार्गदर्शक बलभीम अर्जुन काळे ( वय -80 वर्षे, अगोती नं.2) व आमचे युवा सहकारी बापूराव किसन बंडगर (वय – 43 चाकाटी) यांच्या दु:खद निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. समाजातील अडचणीतील माणसांना, गोरगरिबांना मदत करण्याचे काम बलभीमतात्या व बापूराव बंडगर यांनी केले, अशा शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. (Death of Balbhim Kale and Bapurao Bandgar is a loss to society: Harshvardhan Patil)
अडचणीतील माणसांना, गोरगरिबांना होता आधार
बलभीमतात्या काळे यांचे वृद्धपकाळाने मंगळवारी निधन झाले. कर्मयोगी शंकररावजी (भाऊ) पाटील यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याचे 15 वर्षे संचालक, अगोती गावचे अनेक वर्षे सरपंच, विविध संस्थांची पदाधिकारी म्हणून चांगले काम केले. (Indapur News) माणसे जोडण्याची कला तात्यांकडे होती. अगोती परिसरातील वाद, तंटे तात्या जागेवरच मिटवत असत. त्यांच्या सामाजिक कामांमुळे अगोती तसेच उजनी पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील जनतेला बलभीमतात्यांचा मोठा आधार होता. महिनाभरापूर्वी मी अगोती नं.2 येथे जाऊन बलभीमतात्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती, अशी आठवणही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितली.
बापूराव बंडगर यांचे अपघातामध्ये सोमवारी निधन झाले. ते आमचे निकटचे सहकारी होते. त्यांचे वडील कै. किसनराव बंडगर हे कर्मयोगी शंकररावजी(भाऊ) पाटील व लोकनेते शहाजीराव(बापू) पाटील यांचे जवळचे सहकारी होते. (Indapur News) बापूराव बंडगर सुस्वभावी होते. त्यांच्या कमी वयामध्ये अचानकच्या जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.