पुणे : सध्या देशात महागाई प्रचंड वाढत आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक बोर्डानं शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हि माहिती दिली आहे. ते म्हणाले, की देशात महागाई खूप वाढत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. पालकांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने शैक्षणिक कर्जात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
‘आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज १५ लाख रुपये होते. तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्यासाठी ४० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज २५ लाखांपर्यंत मिळत होते.’ शिवाय, गृह कर्जात देखील वाढ करण्यात आली असून बोर्डाकडून शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बोर्डानं घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.