पुणे : राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींसाठी १८ ऑगस्टला होणार असून मतमोजणी १९ ऑगस्टला होणार असल्याचे आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.
दरम्यान आज दुपारी दिल्लीमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची सरकारची भूमिका असुने पावसाळ्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विचार आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.
दरम्यान आरक्षणाबाबत दिल्लीमध्ये तुषार मेहता यांची भेट घेऊन चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणूका पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
आषाढी नंतर मंत्रीमंडळ विस्तार:
दरम्यान आषाढी एकादशीच्या पूजेनंतरच राज्यात मंत्री मंडळ विस्तार होईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. एकादशी झाल्यावर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही चर्चा करून या विषयी ठरवू असे ते म्हणाले. त्यामुळे १२ किंवा १३ जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.