सोलापूर : अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला बिल भरले नसल्याने चक्क एक महिना रुग्णालयातच डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. संबंधित रुग्णांने बाथरूममध्ये जाऊन मोबाईल वर व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर अपलोड केल्याने त्याची सुटका झाली आहे.
महेंद्र गायकवाड (रा. पैठण, जि. औरंगाबाद) असे डांबून ठेवलेल्या जखमी रुग्णाचे नाव आहे. तर आधार सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सोलापूर असे त्या रुग्णालयाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र गायकवाड याचा सोलापूर-पुणे महामार्गावर झाला होता. त्यामुळे त्याला सोलापुरातील आधार सुपर स्पेशलिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर होती. त्यावर चार शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. परंतु रुग्णाची व त्याच्या नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने बिल भरण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. जवळपास ५ ते ६ लाख रुपये हॉस्पिटलचे बिल झाले होते.
रुग्णाच्या नातेवाईकांनी औषध दुकानाची सर्व बिल असे एकूण ३ लाख ५० हजार भरले होते. ५ जुलैला डिस्चार्ज दिला व हॉस्पिटलचं बिल भरा म्हणून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तसेच पैसे भरल्याशिवाय जाता येत नाही म्हणून रुग्ण व त्याच्या पत्नीस जाऊ दिले नाही. त्यामुळे रुग्णाला १ महिना ६ दिवस रुग्णालयात डांबून ठेवले होते. मात्र रुग्णांने बाथरूममध्ये जाऊन मोबाईल वर व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडीओ थेट मुख्यमंत्री कार्यालयात पर्यंत जाऊन पोहोचला.
सोलापुरातील एकनाथ शिंदे समर्थक मनीष काळजे यांनी हा व्हिडीओ पहिला आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांसोबत चर्चा केली. त्यांनी आपल्या समर्थकांसह सोलापुरातील आधार हॉस्पिटल गाठले आणि रुग्णाची तब्येतीबाबत विचारपूस करत डिस्चार्ज तारीख विचारून घेतली. रुग्णालयाने देखील आडमूठ भाषेत उत्तर देत बिल भरा आणि घेऊन जा असे सांगितले. यावरून काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. महिनाभर रुग्णास डांबून ठेवले, वेठीस धरले असे करणे बेकायदेशीर आहे असे सांगितले आणि तुम्ही प्रशासनाकडे दाद मागा असे सांगत रुग्णाची सुटका केली.
दरम्यान, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांनी सोलापुरातील मनीष काळजे यांना माहिती दिली आणि तात्काळ महेंद्र गायकवाड या रुग्णाची सुटका करावी असे सांगितले. त्यानुसार मनीष काळजे यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत जाऊन हॉस्पिटल प्रशासनास जाब विचारला आणि डिस्चार्ज झालेल्या रुग्णास असे वेठीस धरता येत नाही असे सांगितले.