लोणी काळभोर : श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ”रामदरा” हे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र भाविक भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील निसर्गरम्य वातावरण हे एक पर्यटकांचा आकर्षक केंद्रबिंदू ठरत आहे.
पुणे – सोलापूर महामार्गावर पुण्यापासुन अठरा किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर गावाच्या दक्षिणेला डोंगराच्या पायथ्याशी रामदरा हे तीर्थक्षेत्र आहे. विविध प्रकारच्या झाडांच्या हिरवाईमध्ये व निळ्याशार पाणी असलेल्या तलावाच्या काठावर रामदरा वसलेले आहे.
कै. सदगुरू 1008 श्री देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांच्या पन्नास वर्षांच्या अथक प्रयत्नातून रामदरा शिवालय साकारले आहे. पुणे – सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर येथे पीएमपीएल बस, रेल्वे किंवा स्वताच्या वाहनाने येऊन रामदरा येथे जाता येते. बसने किंवा रेल्वेने येणाऱ्या भाविकांना रामदरा येथे जाण्यासाठी भाड्याने रिक्षा मिळू शकतात. सोलापूर महामार्गावरुन साधारण सात किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी रामदरा वसलेले आहे.
किंवा पुणे – मिरज रेल्वेने फुरसुंगी रेल्वे स्थानकावर उतरून रामदरा येथे पायी जाता येते. येथील परिसर अतिशय सुंदर व निसर्गरम्य आहे. येथे आल्यावर तळ्याच्या काठी असलेल्या मंदिरांचा समूह पाहून आपले देहभान हरपते. आज आपण जे रामदरा चे स्वरूप पाहतो पूर्वी असे नव्हते. धुंदीबाबांनी अक्षरशः डोंगर व खडक फोडून रामदरा तयार केला आहे. धुंदीबाबा हे मूळचे सातारा जिल्ह्यातील बेलावडे गावचे होते.
बाबाजी येथे आले तेव्हा हा परिसर म्हणजे ओसाड माळरान होते. बाबांनी आपल्या कष्टाने येथे नंदनवन फुलविले आहे. डोंगरावर उगललेली झाडे झुडपे सोडली तर हे पूर्ण माळरान होते. त्या वेळी येथे एक पडकी धर्र्मशाळा, शिवलिंग, पादुका होत्या. जवळच एक तळे होते. त्याला रामकुंड म्हणत. त्याकाळीही लोक दर्शनासाठी येत असत. रात्रीच्या वेळी मात्र मुक्कामी कोणी थांबत नसत. अशा ओसाड आणि निर्जन ठिकाणी बाबांचे आगमन झाले आणि परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला.
धुंदीबाबांनी पूजाअर्चा व धार्मिक कार्यक्रम चालू केले. भक्तांची गर्दी वाढली. त्या भक्तांच्या ऐच्छिक लोकवर्गणी मधून महादेव मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले. अशाच दानशूर व्यक्तींच्या देणगीतून वेगवेगळी मंदीरे बांधण्यात आली. सन 1982 व 1996 साली विश्वशांती व लोककल्याणासाठी सपादकोटी गायत्री महायज्ञ करण्यात आले. या दोन्हीही महायज्ञांच्या वेळी चारही पीठांचे शंकराचार्य आवर्जून उपस्थित होते. या गायत्री महायज्ञाच्या वेळी देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असत. यावेळी येथे येणाऱ्या लाखो भाविकांना आमटी भाताचा प्रसाद चोवीस तास चालू होता. हे दोन्ही महायज्ञ फार मोठय़ा प्रमाणावर यशस्वी झाले. सोमवार दि. 24 जून 2002 ला धुंदीबाबांनी आपली इहलोकातील यात्रा संपविली. पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना सहकुटुंब छोटीशी सहल काढण्यासाठी रामदरा हा उत्तम पर्याय आहे.
या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलेले शिवलिंग स्वत बाबाजींनी घडविलेले आहे. या शिवलिंगामध्ये बारा ज्योतीर्लिंगांचा समावेश आहे. ते पौराणिक संकल्पनेनुसार बनविण्यात आले आहे. पाहण्यास दुर्मिळ अशा शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची शाळूका ऊज्जैनच्या महाकालेश्वरासारखी आहे.त्या वर असणारा सर्पफणा हा औंढ्या नागनाथच्या शाळूंके वरील सर्पफण्या प्रमाणे आहे. शिवलिंगावरील खाच ही काशीविश्वेश्वराच्या शिवलिंगाप्रमाणे तर त्यावरील रेखा या श्रीशैल्य मल्लिकार्जूनाच्या शिवलिंगावरील रेखेप्रमाणे आहेत. हे एकच मंदिर असे आहे की ज्या ठिकाणी आपणाला दत्त , राम आणि शिवाचे दर्शन घडते.
रामदरा येथील वातावरण पावसाळ्यात अत्यंत आल्हाददायक व सुंदर असते. गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारच्या वन विभागाच्या वतीने येथे पर्यटकांसाठी सुशोभिकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एक छोटासा लाकडी पूल, बसण्यासाठी आकर्षक झोपडय़ा बनवण्यात आल्या आहेत. सध्या व्हाॅटस अॅप, फेसबुक या सोशल मीडियाने तरुण पिढीच्या मनावर गारूड घातले आहे. परिसरातील तरुण पिढीने सोशल मिडीयावर टाकलेले बहुतेक सर्व फोटो रामदरा येथेच काढलेले आहेत.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या पायथ्याला हे ठिकाण आहे. बरेच पर्यटक पहाटे किंवा सकाळी डोंगर चढून वर जातात. तेथे रामायण काळातील पाणी असलेले एक छोटे तळे आहे. या तळ्याला सीतेची न्हाणी असे म्हणतात. रामदरा येथे भेट देण्यासाठी वर्षभरात कधीही आले तरी चालते. परंतु जून महिन्या पासून डिसेंबर, जानेवारी महिन्या पर्यंत येथील वातावरण अत्यंत सुंदर, अप्रतिम व आल्हाददायक असते. गुरुवारची औद्योगिक कामगारांची सुट्टी व रविवारी येथे दिवसभर गर्दी असते. आलेल्या पर्यटकांना येथे चहा, नाश्ताची सोय करण्यासाठी छोटी टपरीवजा हाॅटेल आहेत. सहकुटुंब येणारे पर्यटक शक्यतो घरुनच जेवण घेऊन येतात. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे पर्यटक निवांतपणे निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.
रामदरा येथे रामनवमी, दत्तजयंती, दहिहंडी, गुरु पोर्णिमा, धुंदीबाबांचा स्मृतिदिन, त्यांचे शिष्य मंगलपुरी महाराज यांचा स्मृतीदिन आदी उत्सव साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमांच्या वेळी उपस्थित भाविकांना भात आमटीचा प्रसाद दिला जातो. वेळोवेळी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. तसेच दर रविवारी आलेल्या भाविकांना भात आमटीचा प्रसाद दिला जातो. सध्या महंत हेमंतपुरी महाराज धुंदीबाबांचे उत्तराधिकारी म्हणून काम पहात आहेत. दररोजच्या धकाधकीच्या जीवनात सुट्टीच्या दिवशी रामदरा येथे सहकुटुंब सहल आयोजित केल्यास मनाला अतिशय प्रसन्न वाटते.