संदीप टूले
Daund News दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील माटोबा विद्यालयात २२ वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. २२ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र प्रथमच एकत्रितपणे भेटल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. “तेच मित्रमैत्रिणी, तीच वर्गाची खोली, तेच बेंच, तीच सकाळची प्रार्थना, तेच दुपारचे झाडाखालचे जेवण, तीच दोस्ती दुनियादारीचे” याचे दर्शन पुन्हा २२ वर्षांनी अनुभूवायला मिळाले. (Daund News)
नाथाचीवाडी (ता. दौंड) येथील माटोबा विद्यालयात २००१ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र जमले होते. या वेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. २२ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून गेले होते.
अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करून देखील आपापल्या कामामध्ये व्यस्त असणारे ४० हुन अधिक माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले. आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्वत्र विखुरलेले विद्यार्थी एकत्र आले होते. शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, आपल्यातील काही मित्रांचे व शिक्षकांचे निधन झाले होते. यावेळी त्यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्वांनी आपले आपले परिचय देऊन २२ वर्षातील सुख दुःखाचे अनुभव सांगून मने हलके केले. त्यानंतर शेवटी पसायदानाने या मेळाव्याची सांगता झाली..
यावेळी संतोष नातू,अंकुश कदम,निलेश दोरगे,राहुल कुदळे, विट्टल ठोंबरे,दत्तात्रय शितोळे, रोहिणी ठोंबरे,साधना होले,गणेश इनामके, गणेश जगताप व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.