अजित जगताप
सातारा : शासकीय पातळीवर दंडात्मक कारवाई करूनही दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या बड्या कंपनीला आज महसूल विभागाने हिसका दाखविला. खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सातारा-पंढरपूर रस्त्यावरील कामांची वाहने जप्त करून वडूज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यातच पश्चिम महाराष्ट्रातील मोठी कारवाई झाल्याने सुमारे पावणे सात कोटी रुपयांचा माल ही वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सदर प्रकरणी कारवाई करून दंड वसूल करावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आंदोलनाची भूमिका घेतली होती.तत्पूर्वी खटाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी अभय शिंदे, निनाद जाधव, किशोर घनवट, गणेश पिसे, सुनील सत्रे, गणेश राजमाने, गौरव खटावकर, एस व्ही बदडे यांनी दुपारी एक वाजता पुसेगाव- निढळ रस्त्यावर पाच मिक्सर, तीन डंपर, तीन ट्रॅक्टर, व दोन पोकलांड अशी तेरा वाहने ताब्यात घेतली.
सदर वाहने वडूज येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. मेगा इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड कंपनीने गौण खनिज चा वापर करूनही शंभर कोटी रुपयांचा दंड न भरल्याने खटाव तहसीलदार जमदाडे यांनी कारवाई केली होती. त्यानंतर दंड वसूल न झाल्याने पुढील कारवाई चा भाग म्हणून वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण पावणे सात कोटी रुपयांची वाहने जप्त केली आहेत. या कारवाई चे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
१०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याशिवाय कोणतेही आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे आंदोलकांनी ठणकावून सांगितले. तसेच ८० हजार ब्रास खडीचा वापर संबधित कंपनीने करू नये असा खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांनी आदेश दिला आहे.या खडीची बाजार भावा प्रमाणे साडेसात कोटी रुपये एवढी किंमत आहे. पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने सामान्य जनतेला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. एखादया प्रकरणात पाठपुरावा केल्याशिवाय न्याय मिळत नाही. याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.