लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परीसरातील स्टेशन भागात रविवारी (ता. 7) रात्री दहा वाजनेच्या सुमारास नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन, दहशत माजवणाऱ्या ऋषिकेश पवार (रा. कदमवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) टोळीतील सहा जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या सहा आरोपींच्यापैकी तीन जण अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केलेली असली तरी, टोळीप्रमुख ऋषिकेश पवारसह तीनजण अद्याप फरार आहेत.
लोणी काळभोर व हडपसर पोलिसात ऋषिकेश पवार याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असुन, एका गुन्ह्यात शनिवारी न्यायालयाने जामिन मंजुर केल्याने तो तुरुंगाबाहेर आला होता. ऋषिकेश पवार हा तुरुंगातुन सुटुन आल्याच्या आनंदात, ऋषिकेश पवार व त्याच्या नऊ सहकाऱ्यांनी लोणी स्टेशन परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह तासभर गोंधळ घातला होता.
दरम्यान लोणी काळभोर (स्टेशन) परीसरात तलवारी घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ऋषिकेश पवार, सुमित सुरेश चव्हाण (वय-१८), रोहन वसंत गायकवाड वय-१९, रा. तिघेही कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता.हवेली) अनिकेत यादव, शुभम पालवे, महेश उर्फ मोन्या राजू काळे (वय -१८, रा. तिघेही कदमवाकवस्ती, ता. हवेली) व त्यांचे तीन अल्पवयीन सहकारी अशा नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरील नऊ जणांच्यापैकी अनिकेत यादव, शुभम पालवे, महेश उर्फ मोन्या राजू काळे यांच्यासह तीन अल्पवयीन मुले अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर टोळीप्रमुख ऋषिकेश पवार, सुमित चव्हाण व रोहन गायकवाड हे तिघे फरार झाले आहेत.
लोणी स्टेशनहुन इंदीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजनेच्या सुमारास ऋषिकेश पवार व त्याचे वरील आठ ते दहा सहकारी गुंड हातात नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन अवतरले. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना शिवीगाळ करण्याबरोबरच, रस्त्यात दिसेल त्या वाहनांना अडवुन दमबाजी करण्यास सुरुवात केली. आठ ते दहा जणांचा नंगानाच पाहुन अनेक नागरीकांनी आपआपली दुकाने बंद करुन, दुकानातच बसणे पसंत केले. त्यातच आठ ते दहा जण रस्त्यातुन जातांना शिवीगाळ व हातपाय तोडण्याची भाषा करत असल्याने, लोणी स्टेशन परीसरात एकच भितीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान घडलेली घटनेची माहिती वरीष्ठ पोलस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच, पोलिसांनी वेगणान हालचाली करत, मागिल तीन दिवसाच्या वरील सहा जणांना विविध ठिकाणाहुन ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल वरील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्यांच्यावर लोणी काळभोर व हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे दाखल आहेत.