पुणे : देशभरात उद्या (ता. ११) राखी पोर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. प्रत्येकाला बहीण असावी असे वाटत असते. राखी पोर्णिमेच्या दिवशी तर बहिणीची कमतरता जास्तच भासते. अशा वेळी एका तरुणाने चक्क डेटिंग अॅपवर बहिण शोधली आहे. त्यांची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
तरुणाई या अॅपवर डेटिंगसाठी पार्टनर शोधत असतात. मात्र या तरुणाने येथून बहिणी शोधून काढल्याने त्याची चांगलीच चर्चा होत आहे. “यावर्षी मला टिंडरवर दोन बहिणी मिळाल्या आहे. यावेळी आम्ही तिघे जण रक्षाबंधनला एकत्र येऊन हा सण साजरा करणारआहोत. आम्ही एकमेकांना गिफ्ट देखील देणार आहोत,” असे या तरुणाने पोस्टमध्ये लिहिले आहे.
बहीण नसलेल्या मुंबईतील एका भावानं रॅडीटवर एक पोस्ट (Reddit Post) केली होती. यावर त्याने टिंडर (Tinder) या डेटिंग अॅपवरुन बहिणींचा शोध घेतल्याची सांगितले आहे. दोन दिवसात त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्ला 500 अपव्होट्स मिळाले आहेत.
या पोस्टमध्ये त्याने ‘रक्षाबंधनाला आपल्याला बहीण नसल्याने ‘FOMO’येत आहेत असे म्हटले होते. तसेच मला कुणी राखी बांधायला देखील नव्हते आणि गिफ्ट द्यायला देखील कोणीच नव्हते. गेल्या दोन वर्षांपासून रक्षाबंधनाच्या 2 आठवड्यापूर्वी मी बायो मध्ये “Looking for a sister to hangout during Rakshabandhan”असे टाकत होते.
केरळ येथील एका यूजरने बंबल या डेटिंग अॅपवर जून महिन्यामध्ये मुंबईत फ्लॅट शोधला होता. यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता मुंबईच्या या तरुणाने चक्क डेटिंग अॅपवर बहीण शोधल्याने त्याची सगळीकडेच चर्चा होत आहे.