दिनेश सोनवणे
दौंड : मलठण (ता. दौंड) येथील भिमानदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा केंद्रावर दौंड पोलिसांनी मंगळवारी (ता.९) छापा टाकला. या छाप्यात ७२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू पाण्यात बुडून नाश केली आहे. तर ७ हून अधिक वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी मनोहर येडे (रा.खानावटा ता.दौंड जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर गणेश मारूती शेंडगे, घनशाम विश्वनाथ देवकाते, नवनाथ दगडू वाघमोडे, गोरख नामदेव वाघमोडे, आबा पाडूरंग सरोदे, गोरख अरून वाघमोडे (सर्व रा.मलठण ता.दौंड जि पुणे) आणि सहा ट्रक वरिल पळून जाणारे चालक व त्यांचे मालक यांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी असिफ नबिलाल शेख (वय-४४, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पुणे ग्रामीण) यांनी सरकारतर्फे दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण (ता. दौंड) येथील भिमानदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस हवालदार असिफ शेख यांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, पोलिसांना वरील आरोपी बेकायदा विनापरवाना भिमानदीच्या पात्रातून फायबर बोटीच्या सहाय्याने वाळू काढत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सदर ठिकाणाहून सहा ट्रक, दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू असा तब्बल ७२ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यातील दोन फायबर बोटी व त्यामधील सात ब्रास वाळू पाण्यात बुडून नाश केली आहे. तर ट्रक चालक संभाजी येडे याला ताब्यात घेतले आहे. सर्व ट्रक पोलिस मित्रांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, वरील सर्व ७ हून अधिक वाळू माफियांवर दौंड पोलीस ठाण्यात खाण आणि खनिज अधिनियम 1957 चे कलम 4,21,पर्यावरण संरक्षण अधिनियम -9,21 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी, पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.