Baramati News | बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काटेवाडी (ता. बारामती) येथे केलेल्या कारवाईत तिघांकडून दोन गावठी पिस्तुल व जीवंत काडतुसे जप्त केली आहेत.
आकाश उर्फ अक्षय संतोष खोमणे (रा. चिखली, ता. इंदापूर), सोमनाथ ज्योतिराम खुरंगे (रा.रुई पाटी हनुमान मंदिराशेजारी, बारामती) आणि ऋषिकेश नितीन सावंत (रा. जाचकवस्ती, ता. इंदापूर) अशी आरोपींनी नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती एमआयडीसीसह तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हे पथक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी काटेवाडी येथील उड्डाणपूलाखाली दोन जण संशयास्पदरित्या उभे असलेले दिसले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली. कमरेजवळ त्यांनी पिस्तुल लपविलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यांनी ऋषिकेश नितीन सावंत याच्याकडून ती खरेदी केल्याचे सांगितले.
या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक अमित पाटील, अभिजित सावंत, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, सचिन घाडगे, अभिजित एकशिंगे, अजित भुजबळ, जनार्दन शेळके, विजय कांचन, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन यांनी केली.