हडपसर : पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा. याचे प्रबोधन करणे व मुलांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने हडपसर येथील सिध्देश्वर व शिवसमर्थ संस्था यांनी शाडूच्या माती पासून गणेश मुर्ती बनविण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
महात्मा फुले वसाहत येथील शालेय विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणेश मुर्ती बनविण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व धर्मिय बालगोपाळांनी ‘श्री गणेशाचा’ आकार देऊन सुंदर व सुबक मुर्ती बनवित विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्ती पाहून विद्यार्थ्यांनमधील कलागुणांना पाहून त्यांच्या पालकांनी कौतुकाने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. श्री गणरायाचे रुप साकारताना मुले हरखून गेली होती.शाडूच्या मातीपासून वेगवेगळ्या स्वरुपातील गणपती बाप्पा आकार घेत होते. हडपसर येथील डॉ. गणपत शितोळे यांनी हे प्रशिक्षण दिले.
दरम्यान, शाडू माती उपलब्ध करून दिली व प्रशिक्षणही मोफत दिले. पर्यावरण रक्षणाचा संदेश ठिकठिकाणी दिला जातो. शासनाच्या वतीनेही प्रयत्न केले जातात. मात्र आपणही पर्यावरण संरक्षणासाठी व प्रदुषण नियंत्रणासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणाचे संस्कार करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेतले.
डॉ शितोळे यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव ही काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनिषा वाघमारे, सचिव आरती जगताप व सिध्देश्वर संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे यांनी केले होते. यावेळी संजय शिंदे, शीतल शिंदे, सुषमा पिसाळ, जयप्रकाश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.