Manchar News | मंचर (पुणे ) : वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटून तिचे तोंड मातीत दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंचर येथील पांढरीमळा वस्तीवर मंगळवारी ( ता. 9) दुपारी घडली.
अंजनाबाई प्रभाकर बाणखेले (वय 78) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
ओळखीतीलच कामगारानेच तिचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक परराज्यात रवाना झाले आहे. पांढरीमळा मंचर येथे अंजनाबाई बाणखेले या घरी एकट्याच राहतात. त्यांना तीन मुलगे व तीन मुली असून, मुलगे कामानिमित्त मुंबई येथे असतात. एक परिचयाचा कामगार बाणखेले यांना नेहमीच मदत करण्यासाठी घरी येत असे. बाणखेले यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. त्याच्यावर या कामगाराची नजर होती.
सोमवारी दुपारी दोन वाजता अंजनाबाई बाणखेले या घरातून निघून गेल्या. मुंबईतून मुलाने फोन केला. मात्र, तो बंद लागल्याने त्यांनी शेजार्यांना शोध घेण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. मंचर पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव विष्णू बाणखेले यांनी त्या हरविल्याची तक्रार मंचर पोलिसात दिली. येथून जवळच उजवा कालवा गेल्याने तेथेही शोध घेण्यात आला.
यादरम्यान संबंधित कामगाराने उसनवारीचे पैसे देण्यासाठी एका व्यक्तीला दागिने दिले होते. ही गोष्ट समजल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्या कामगाराला फोन केला असता त्याने परराज्यात असल्याचे सांगितले व उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्यानंतर कसून चौकशी केली असता वृद्धा अंजनाबाई बाणखेले यांचा खून केल्याचे त्याने कबूल केले.
पोलिस निरीक्षक सतीश होडगर, भाजपचे संजय थोरात, वसंतराव बाणखेले, रवींद्र गांजाळे व पोलिस पथकाने शोध घेतला असता घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या शेतामधील गवतात वृद्धेचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल चोरून नेण्यात आले होते. मातीत तोंड दाबून तिचा खून केला होता. हातातील पाटल्या काढता न आल्याने त्या तशाच राहिल्या होत्या. परराज्यात गेलेल्या कामगाराला परत आणण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.