लोणी काळभोर, (पुणे) : पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोरतर्फे सतत सात दिवस विविध ११ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी दिली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमात एमआयटी एडीटी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ वैदिक सायन्सतर्फे स्वस्थ भारत, आरोग्य भारत आणि आयुष्यमान भारतसाठी रॅली, एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड थियटरतर्फे फ्रिडम स्ट्रगल नावाचे नाटक, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग रिसर्च आणि सायन्सतर्फे इनव्हायर्मेंट ७५, फाईन आर्टतर्फे एक भारत श्रेष्ठ भारत यावर पोस्टर सादरीकरण, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगतर्फे इनोव्हेशनवर प्रदर्शन, स्कूल ऑफ एज्युकेशनतर्फे स्वातंत्र्य २.० वर निबंध स्पर्धा, मिटकॉमतर्फे महिलांच्या स्वातंत्र्यांवर टॉक शो, फिल्म अँड थियटरतर्फे स्वातंत्र्यांवरील प्रसिद्ध चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
एमआयटी स्कूल ऑफ फुड आणि टेक्नॉलॉजीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, ह्युमिनिटीसतर्फे ग्राम व्हिलेज ७५ या थीमवर रोड प्ले आणि १५ ऑगस्ट २०२२ ला एमआयटी मॅनेटतर्फे झेंडावंदन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम ८ ते १५ ऑगस्टच्या दरम्यान ७ दिवस साजरे करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ८ ते १५ ऑगस्ट दरम्यान विद्यापीठात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमासाठी विद्यापीठाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे आयोजन केवळ सरकारी न ठेवता त्यात विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक सहभाग कसा ठेवता येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.