Shirur Crime | शिक्रापूर : जमिनीच्या वादातून दोन गटात पुन्हा तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी योगेश पांडूरंग गवारी (वय ३६ रा. मीरगव्हाण वस्ती विठ्ठलवाडी ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नवनाथ ज्ञानोबा हंबीर, विठ्ठल ज्ञानोबा हंबीर, कांतीलाल दत्तोबा हंबीर, सुरेश दत्तात्रय हंबीर, स्वप्नील विठ्ठल हंबीर, शुभम नवनाथ हंबीर, दिलीप दत्तोबा हंबीर, निवृत्ती गेनभाऊ हंबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ हंबीर व योगेश गवारी यांच्यात २ दिवसांपूर्वी जमिनीच्या वादातून हाणामारी झाली होती. याप्रकरणी नवनाथ हंबीर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चा होऊन तक्रार मिटवण्याचे ठरले होते.
दरम्यान, फिर्यादी नवनाथ हंबीर हे शेतात काम करीत असताना योगेश सदर ठिकाणी चर्चा करण्यासाठी गेले होता. तेव्हा हंबीर याच्या भावकीतील लोकांनी सदर ठिकाणी येत योगेश गवारी यास काठीने बेदम मारहाण केली. यावेळी योगेश याने आरडओरडा केल्याने त्याच्या घरातील लोक धावून आल्याने मारहाण करणारे सर्व जण पळून गेले.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अमोल चव्हाण करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!