पाचगणी : तत्कालीन शासनाच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब भिलारे यांनी स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला पुस्तकांच्या गाव म्हणून नावारूपाला आणले. कृषी पर्यटनाची संकल्पना ही त्यांचीच आणि त्यांच्याच स्वप्नातील आगळेवेगळे भिलार गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
भिलार (ता. महाबळेश्वर) ग्रामपंचायत हद्दीत वन विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त माध्यमातून विविध पर्यटन स्थळांची निर्मिती होत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. ०७) टायगर केव्ह आणि सनसेट पॉइंटचा लोकार्पण सोहळा मकरंद पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, युवा नेते नितीन भिलारे, माजी सभापती संजय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, अरविंद माने, वन अधिकारी परदेशी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र राजपुरे म्हणाले, “वन विभाग आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. काही ठिकाणी वन विभागाच्या हद्दीतून रस्ते जातात म्हणून ते बंद पाडले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक जनतेला विश्वासात घेवून निर्णय घ्यावेत.
संजूबाबा गायकवाड म्हणाले, “वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून आपल्या कर्तव्याबरोबरच ग्रामस्थांचीही विचार करावा. नितीन भिलारे म्हणाले, “भिलारमध्ये आलेले पर्यटक दिवसभर गावातच रमतील यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत याला आपलेकडून बळ मिळावे.
प्रवीण भिलारे यांनी प्रास्ताविकात गावच्या विविध संकल्पविषयी माहिती देताना या सर्व पॉइंटच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगून सर्वांचे स्वागत केले. यावेळी टायगर केव्ह आणि सनसेट पॉइंटच्या फलकाचे उद्घाटन मकरंद पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले. तर ग्रामस्थांच्या वतीने हील रेंज हायस्कूल आमदार पाटील, वनविभागाचे अधिकारी व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, गणपत पार्टे यांनी वन हद्दीतून येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेती क्षेत्र घटू लागले आहे ही चिंतेची गोष्ट असून यासाठी आम्ही चेनलिंग प्रस्ताव पाठवले आहेत. याबाबत विचारले यावर राजूशेठ राजपुरे यांनी आबा ही चिंतेची बाब असून वरिष्ठ पातळीवरून वेगळा निधी टाकावा व वाढू लागलेले पडीक शेती क्षेत्र वाचवावे अशी मागणी केली.