पुणे : शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो. असे म्हणत पोलीस नाईककडून चक्क एक कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे (रा. कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्या विरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवडे हा सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
तक्रारदार देहुगाव (ता. हवेली) येथील शेतजमिनीचे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा सुरू आहे. यावेळी एका अनोळची व्यक्तीने तक्रारदाराशी फोनवरून संपर्क साधून एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे, तुम्ही भेटा असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ ला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून अनोळखी व्यक्तिची भेट घेतली.
यावेळी तो व्यक्ती पोलीस वर्दीमध्ये त्यांना भेटला. यावेळी त्या पोलिसाने पुणे येथील दाव्याबाबत तुमच्या विरुद्ध पार्टीने आम्हाला एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला. तसेच खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देवू शकता? समोरच्या पार्टीने एक कोटीची ऑफर दिली आहे? असे म्हणत एक कोटीच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.
कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईक तिवडे यांनी २२ मार्च २०२२ ला शासकीय पंच साक्षीदारांचे समक्ष कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हॉटेल सुब्राय येथे तक्रारदाराकडे जमिनीबाबत एमआरटी कौसिंल पुणे येथील दाव्याचे निकाल तेथील प्रशासकीय सदस्य माने साहेब यांना सांगून त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी तक्रारदार चव्हाण यांचे विरुद्ध पार्टीने एक कोटी रुपयेची ऑफर दिली.
दरम्यान, तक्रारदार यांना त्यांचे घरच्यांशी चर्चा करून विरोधी पार्टीचे ऑफर प्रमाणे करा, असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. तक्रारदारांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी जॉन वसंत तिवडे यांचे विरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपी तिवडे हा सध्या फरार आहे.