Pune Crime पुणे : ससून रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका आरोपीने पोलिसांना चकवा देऊन पलायन केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आर्म अॅक्टखाली त्याला अटक करण्यात आली होती. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला एकटे सोडल्याचे पाहून त्याने हातातील बेडी काढून धुम ठोकली.
बाळु ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे (वय ३०, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. २६ मध्ये शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश मांडगे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
बाळु गोडसे याला श्रीगोंदा पोलिसांनी शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी १९ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. वॉर्ड नं. २६ येथे त्याच्यावर मानसिक उपचार करण्यात येत होते. त्यासाठी बंदोबस्तासाठी पोलिसांची नेमणूक केली होती.
दरम्यान, फिर्यादी व पोलीस शिपाई संजय कोतकर हे कर्तव्यावर होते. आरोपीला कधी डिस्चार्ज देण्यात येणार हे विचारण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्याचवेळी कोतकर हे वॉशरुमला गेले. हे पाहून गोडसेने बेडीमधून त्याचा हात काढून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.