Lonavala Crime | लोणावळा, (पुणे) : पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पवनाधरण परीसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या एका युवकाचा पवना धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फांगणे गावच्या हद्दीत घडली आहे.
साहिल विजय सावंत (वय १८, रा. परळ, मुंबई) असे पवना धरणात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
धरण परिसर खोलगट…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई परळ येथील नऊ युवक आणि नऊ युवती असे एकूण १८ जण दुपारी पवना धरण परिसरात पर्यटन व फिरण्यासाठी आले होते. हे सर्वजण पवनाधरण पाणलोट क्षेत्रातील सांगणे गावच्या हद्दीत पवना धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. हा धरण परिसर खोलगट असल्याने पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या पैकी साहिल याला येथील धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.
साहिल बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीची मागणी केली. आरडाओरड ऐकून परीसरात असलेल्या टेंट व्यवसायिक व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत या घटनेसंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क केला.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले. शिवदुर्गचे आपत्कालीन पथक पाण्यात बुडालेल्या युवकाचा शोध घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!