Pune Crime | पुणे : भावाने व्याजाने घेतलेल्या पैशाच्या कारणातून त्याच्या बहीण, दाजी व आईवडिलांसह चौघांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. ही घटना सारसबाग ते नांदेड सिटीजवळील फ्लॅटमध्ये १६ एप्रिल ते २० एप्रिल रोजी रात्री दहाच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी दत्तवाडी येथे राहणार्या एका २९ वर्षांच्या महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी कुणाल रावळ, कुणाल रावळ याची पत्नी, पांचाळ व त्यांचा साथीदार अशा चौघांवर अपहणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ संकेत टकले याला पैशांची गरज होती. तेव्हा कुणाल रावळ याने स्वत:च्या गळ्यातील सोनसाखळी देऊन ती गहाण ठेवून पैसे घेण्यास सांगितले. संकेत याने ती सोनसाखळी घेतली. मात्र, त्यानंतर त्याने ती सोडवून आणली नाही. त्याच्या व्याजाचे पैसेही दिले नाही.
कुणाल रावळ याने वारंवार मागणी केल्यानंतरही तो पैसे देत नव्हता. त्याचे आई-वडील, बहीण यांना सांगूनही तो पैसे परत करत नव्हता. त्यानंतर तो पळून गेला. त्याच्या घरचे संकेत याचा पत्ताही देत नव्हते. त्यामुळे त्याने फिर्यादी, तिचा पती व तिचे आई-वडील यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.
दरम्यान, नांदेड सिटी येथील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. चार दिवस डांबून ठेवल्यानंतर गुरुवारी (ता. २०) दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.