बारामती : बारामतीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या माळावरील रिंगरोडवर एका डंपरने १७ मेंढ्याना चिरडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (ता. ०५) दुपारी घडली आहे. त्यामुळे या मार्गावर मेलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
संभाजी मोठे या मेंढपाळाच्या या मेंढ्या आहेत. यामध्ये १७ मेंढ्या अपघातात चिरडल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी डंपर बारामतीकडून इंदापूरकडे निघाला होता. डंपर हा माळावरील रिंगरोडवर आला असता त्याच ठिकाणावरून एक मेंढपाळ त्यांच्या मेंढ्या घेऊन निघाले होते. यावेळी रस्त्यावरुन निघालेला डंपर मेंढ्या अक्षरशः चिरडत पुढे जाऊन थांबला.
दरम्यान, सदरची घटना घडल्यानंतर सदर ठिकाणी पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, भाजपचे अभिराज देवकाते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अभिराज देवकाते यांनी संबंधित मेंढपाळाला नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय डंपर हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली होती. या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी मेंढपाळ महिलेचा आक्रोश पाहुन उपस्थितांची मने हेलावली होती.