Political News | पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना काळात पुणे शहरात उभारण्यात आलेल्या कोवीड जंबो सेंटरचे कत्रांट पाटकर यांना देण्यात आले होते. हा कत्रांट मिळण्यासाठी पाटकर यांनी बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन निविदा मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप…
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊन त्यात 100 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यामुळे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोना काळात बनावट पार्टनरशीप डिड तयार करुन त्याद्वारे पुण्यातील जंबो कोवीड सेंटर उभारण्याची निविदा मंजूर करुन घेऊन पीएमआरडीएची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजु ठाणगे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजीत मुकुंद पाटकर , संजय मदनराज शहा , राजू नंदकुमार साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पुणे शहरात जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. हा कोविड सेंटरचा कत्रांट खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला देण्यात आला होता. दरम्यान हा कत्रांट मिळण्याकरीता वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निवीदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशीप डिड दाखल करुन ही निविदा मंजुर करुन पुणे महानगर विकास प्राधिकरणांची फसवणूक केली असे तक्रारीत म्हटले आहे.