Job पुणे : परीक्षा संपल्या आहेत. नोकरीच्या शोधात आहात ? , तसेच आहे त्या नोकरीमध्ये समाधानी नसाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता नोकरीसाठी कुठेही वणवण करण्याची गरज नाही. कारण तब्बल दोन हजार पदांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्याला हवी तशी नोकरी मिळण्याची ही सुवर्ण संधी आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बानाई संस्था यांच्यातर्फे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा शुक्रवारी (२१ एप्रिल) सकाळी दहा वाजता मोरवाडी पिंपरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खासगी उद्योजक सहभागी होणार असून, सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त सागर मोहिते यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मेळाव्यातील पदांसाठी किमान दहावी, बारावी उत्तीर्ण, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
या संकेतस्थळावर ऑनलाईन करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.
मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या आणि आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले.