(RTE Admission) पुणे : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत शासनामार्फत या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरून घेतले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आणि ऑनलाइन सर्व्हरमध्ये अनेक त्रुटी आहेत. सर्व्हर संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला आहे.
प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे का..?
तसेच यामध्ये अनेक अडचणीदेखील येत आहेत. त्यामुळे प्रशासन आमच्या भावनांशी खेळत आहे का, असा सवालही पालकांनी उपस्थित केला आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर आहे. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. या पडताळणी समितीने कागदपत्रे योग्य असल्याचा शेरा दिल्यानंतरच संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. योग्य कागदपत्रांअभावी पडताळणी समितीने अपात्र शेरा दिल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार आहे.
दरम्यान, आरटीईचे सर्व्हरही चालेना, वेबसाइट संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पाल्यांचा प्रवेश होईल की नाही, अशी चिंता पालकांना सतावत आहे.