Pune Crime पुणे : रेस्टोबार बंद झाल्यानंतर प्रवेश न दिल्याने मालकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी एका वेटरच्या डोक्यात देखील वार करण्यात आले. ही घटना वडगाव बुद्रुकजवळ ग्रीनफील्ड रेस्टोबारमध्ये रविवारी रात्री घडली.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सुमित गंगाधर शेजवळ (वय -२५, रा. शेजवळ हाईट्स, नांदेड फाटा), तेजस रमेश मारणे (वय २४, रा. समर्थ नगर, नांदेड फाटा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. मदनराज गोट्याल, यश शेजवळ आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास हेगडे (वय-३३, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी यांचे वडगाव येथे रेस्टोबार आहे. रात्री एकच्या सुमारास त्यांनी हॉटेल बंद केले असता, आरोपी सुमित शेजवळ गेटवरून उडी मारून आत आला. त्याने हॉटेलमध्ये सर्वांना प्रवेश देण्यासाठी व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षक यांच्याशी वाद घातला. त्यांना प्रवेश दिला नाही, यामुळे ते चिडून जाऊन हॉटेलच्या बाहेर थांबले.
फिर्यादी बाहेर आले असता, सुमितने पाठीमागून येत तुला आज जिवंत ठेवत नाही, असे म्हणत, डोक्यावर, कानावर आणि पाठीवर धारदार हत्याराने वार केले. तसेच, त्याच्या साथीदाराने समोरून येऊन दोन्ही हातावर वार केले.
दरम्यान, इतर टोळक्याने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्यांचा वेटर आसीक मंडल याच्यावरही हत्याराने वार करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चंदनशिव करीत आहेत.