Damini Pathak पुणे : चार वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या आईची खूप आठवण येत असल्याने अल्पवयीन भाऊ-बहीण रत्नागिरीहून थेट पुण्याला निघाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.१७) सकाळच्या सुमारास घडली आहे. मात्र या चिमुकल्यांवर सुदैवाने दामिनी पथकाची नजर Damini Pathak पडली. पथकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे मुले सुखरूप पालकांच्या ताब्यात पोहचली आहेत.
कुमारी साघवी महेंद्र जाधव (वय-१५), यथात महेंद्र जाधव (वय-१३, दोघेही रा.वाघण बौद्धवाडी, ता.लांजा. जि.रत्नागिरी) ही दोन अल्पवयीन बहिण-भाऊ दामिनी पथकाने पालकांच्या ताब्यात दिले आहेत. तर राजापूर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी अशी कार्यतत्परता दाखविलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
चार वर्षांपूर्वी घर सोडून पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत असल्याने पुण्याला जाऊन भेटण्याची इच्छा झाल्याने साघवी आणि यथात हे दोघेजण घरात कोणालाही न सांगता निघाली होती. संध्याकाळ झाल्याने दोन्ही मुले राजापूर एस.टी.डेपो समोर एका बाजुला बसलेली होती. ती मुले राजापूर महिला पोलिसांच्या दामिनी पथकाला दिसली.
तेव्हा पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी यांनी या मुलांकडे विचारणा केली. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
यावेळी मुलांनी सांगितले की, आपली आई चार वर्षांपूर्वी घर सोडून गेली. ती पुणे येथे असून आम्हाला तिची आठवण येत आहे. आम्ही तिच्याशी संपर्क करुन पुणे येथे जात आहोत असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे वडिलांचे नाव विचारले असता मुलांनी महेंद्र गणपत जाधव (रा. वाघण गाव बौद्धवाडी ता. लांजा) असे सांगितले. व वडील कोकण रेल्वेत कामाला असल्याचेही मुलांनी सांगितले.
त्यानंतर दामिनी महिला पोलिसांच्या पथकाने तात्काळ वडिलांना फोनवर संपर्क केला. वडील आल्यावर दामिनी पथक मुलांना वडिलांसह घेवून पोलीस ठाण्यात आले.
राजापूर पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना आणि वडिलांना समजावून सांगितले आणि मुलांचे मन परिवर्तन करुन दोन्हीही मुलांना सुरक्षितरित्या त्यांचे वडील महेंद्र जाधव, चुलते शिलेंद्र यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करुन सांभाळ करण्याबाबात योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
दरम्यान, राजापूर पोलिसांच्या महिला दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघालेली मुले पुन्हा घरी सुखरूप परतली आहेत. यामुळे राजावर पोलिसांच्या दामिनी पथकाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.