Help announced ! मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आयोजित सत्कार समारंभात उष्माघाताने अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५० जणांना उष्माघाताने त्रास झाला आहे. यातील काही जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने या लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही जणांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.