(Junnar) जुन्नर, (पुणे) : कांदा काढणीचे काम सुरु असताना शेतकरी व शेत मजुरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात शेतकरी पती पत्नी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १४) आंब्याच्या झाडावरील मधमाश्यांनी हा हल्ला केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार..!
शिरोली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत कांदा काढणीचे काम सुरु होते. आंब्याच्या झाडावरील हे आग्या मोहळाच्या मधमाशानी यावेळी शेतकरी व शेत मजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. शेतात काम करणारे परप्रांतीय शेतमजूर व त्यांच्या लहान मुलांनाही काही प्रमाणात मधमाशांनी जोरदार डंक केला.
शेतकरी अरुण शेरकर यांना पाचशेहून अधिक माशांनी डंक घेतला असून, त्यांच्या पत्नी पुष्पा शेरकर यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी हल्ला केला आहे. या दांपत्यावर नारायणगाव येथील डॉ. सदानंद राऊत यांच्या रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, उन्हाळ्याच्या दिवसात कडाक्याच्या उन्हामुळे मोहळा वरील मधमाशा अन्नपाण्याच्या शोधात वातावरणात फिरत असतात. अशावेळी आपण त्यांच्यापासून दूर जायला हवे, मोहळाला दगड मारणे, तेथे जोरात आवाज करणे किंवा त्या ठिकाणी धूर करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. असे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले.