लहू चव्हाण
Panchgani पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात गावठाण वाढीचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. असे असताना मिळकती खाली करण्याबाबत महसूल विभागाने नोटीसा बजावून कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई करताना भूमीपुत्रांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र या सूचनेला केराची टोपली दाखवत कारवाईस सुरुवात केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकारी यांना सूचना…!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरचे शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका सांगून चर्चा केली होती. त्यावेळी सकारात्मक चर्चा होऊन महाबळेश्वर येथे याबाबतीत समक्ष चर्चा करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबई येथे शिष्टमंडळासमोर जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन अन्यायकारक कारवाई करू नये व वाढीव गावठाणाचा प्रश्न मार्गी लावावा असे सांगितले होते.
मात्र मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा महसूल विभागाला विसर पडला असून थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यात असंतोष पसरला असून स्थानिक भूमीपुत्र आंदोलनाचे पवित्र्यात असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी दिली.
वाढीव गावठाणाची समस्या प्रलंबित ठेऊन महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक भूमीपुत्रांना अन्यायकारक नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
महसूल विभागाच्या कारवाईमुळे स्थानिक भूमीपुत्रांची कुटुंब उध्वस्त होणार आहेत. त्यामुळे अशी कारवाई तात्काळ थांबवावी व प्रथम वाढीव गावठाणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. महसूल प्रशासनाने या बाबतीत सहानुभूतीने विचार करून सुरू असलेली कारवाई थांबवावी. अन्यथा काही दिवसांतच संपूर्ण तालुक्यात व्यापक जन आंदोलन केले जाईल, असा इशारा राजपुरे यांनी दिला.