पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी आज बुधवारी (ता.३) जाहीर होणार आहे. पहिल्या यादीमध्ये प्रवेश जाहीर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत २१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. हि प्रवेश प्रक्रिया केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीमार्फत घेण्यात आली होती. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिका क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील एकूण १ हजार ६७६ शाळांचा सहभाग आहे. कनिष्ठ महाविद्यालयांतील ५ लाख ७८ हजार जागांवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे.
प्रवेश समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीच्या गुणवत्ता यादीसाठी प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी २७ जुलैची मुदत होती. आणि ३ ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जात त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळण्यासाठी प्रवेश अर्जासाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार आतापर्यंत मुंबईतील १४ हजार २२६, पुण्यात ४ हजार ३५९, नागपूरमधील १ हजार ५८०, नाशिकमधील ७४६, अमरावतीच्या ९९२ विद्यार्थ्यांनी कोटय़ाअंतर्गत राखीव जागांद्वारे प्रवेश निश्चित केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बोलताना केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीच्या सचिव मीना शेंडकर म्हणाल्या कि, जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी जाहीर करण्यात येईल. त्यात प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या पसंतीचा प्रवेश जाहीर होऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांना एका फेरीसाठी प्रवेश प्रक्रियेतून बाद केले जाईल.