लहू चव्हाण
पाचगणी : Pachgani News – येथील शेतकऱ्यांना अधिकच्या उत्पन्नाच्या व्हरायटी कशा देता येतील यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. (Pachgani News) या भागातील शेतकऱ्यांनी अमेरिकेच्या नविन सुधारित जातीच्या रोपांची लागवड केल्यास कमी जागेत जास्त उत्पादन मिळेल. असे प्रतिपादन कॅलिफोर्नियाच्या एकलँड मार्केटिंग कंपनीचे मालक सीईओ पॅट्रिक बॅलेव यांनी केले. (Pachgani News)
पुस्तकांचे गाव व स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर
पुस्तकांचे गाव व स्ट्रॉबेरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या भिलार (ता.महाबळेश्वर) येथील हाॅटेल शिवसागर येथे आयोजित केलेल्या स्ट्राॅबेरी उत्पादकांच्या बैठकीत पॅट्रिक बोलत होते. यावेळी स्ट्राॅबेरी तज्ञ भरत भोजने, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे, महाबळेश्वर फळ फुले व भाजीपाला सहकारी संस्थेचे अध्यक्ष किसनशेठ भिलारे, जावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, माजी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, माजी सभापती विजयकुमार भिलारे, शशिकांत भिलारे, गणपत पार्टे आदी उपस्थित होते.
पॅट्रिक पुढे म्हणाले, ”भारतात सध्याच्या व्हरायटी सहाशे ते सातशे ग्रॅम फळे देतात अमेरिकेच्या नविन सुधारित जातीचे रोप एका वर्षात एका झाडाला दोन किलोपर्यंत फळे देतात, अशा जातींच्या रोपांची या भागात लागवड केल्यास या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.”
राजपुरे म्हणाले, ”स्ट्राॅबेरी उत्पादकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुधारित जातीच्या रोपांची लागवड करुन स्ट्राॅबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे.
प्रास्ताविकात किसनशेठ भिलारे म्हणाले या वर्षी महाबळेश्वर येथील स्ट्राॅबेरीला उच्चांकी भाव मिळाल्याने स्ट्राॅबेरी खरेदी संस्थाना माल घातल्याने येथील शेतकऱ्यांचा पस्तीस ते चाळीस कोटींचा अधिकचा फायदा झाला आहे.यावेळी राजेंद्र सरकाळे, नितीन भिलारे, भरत भोजने यांनी स्ट्राॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन ऑल इंडिया ग्रोवर असोसिएशन व महाबळेश्वर सहकारी फळे फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्थेने केले. ऋतूजा राहूल भिलारे यांनी सुत्रसंचलन केले. गणतप पार्टे यांनी आभार मानले.