Pune Crime | पिंपरी : टाटा मोटर्स कंपनी परिसरात पार्क केलेल्या दुचाकींच्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीच्या माजी कामगारासह दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून सहा लाख रुपये किमतीच्या चोरीच्या २५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
प्रदीप आश्रुबा गायकवाड (वय २५ रा. मोहा, ता. परळी वैजनाथ, जिल्हा बीड), इरफान महेबूब शेख (वय १९, रा. गौतमनगर, परळी, जि. बीड), आकाश अनिल घोडके (वय २४, रा. आझाद चौक, निगडी), जाफर खान (रा. लिंकरोड, चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्स कंपनी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा पोलिस शोध घेत होते. त्यादरम्यान टाटा मोटर्स या ठिकाणी काही दिवसांपूर्वी कामाला असलेल्या एका कामगाराकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर टाटा मोटर्स परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली.
त्यात प्रदीप गायकवाड हा कंपनी परिसरात वावरत असल्याचे समोर आले. तसेच दुचाकी चोरीच्या वेळी त्याचे मोबाइल लोकेशन कंपनी परिसरातील मिळून आले. आरोपी सतत परळी येथे जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने बीड येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची मिळाली. त्याने चोरीच्या दुचाकी इरफान शेख याला विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शेख याला अटक केली. दोघांकडून चोरीच्या २१ दुचाकी जप्त केल्या.
दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिस कर्मचारी जमीर तांबोळी व नामदेव कापसे यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित आकाश घोडके याला ताब्यात घेतले. त्याने शहरातून दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या. तसेच त्याने दुचाकी भंगार दुकान मालक अमजद खान याच्या दुकानात स्क्रॅप केल्याचे समोर आले.
त्यानुसार खान यालाही पोलिसांनी अटक केली. दोन्ही कारवायांमध्ये चोरीच्या ६ लाख रुपये किमतीच्या एकूण २५ दुचाकी जप्त केल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime News | सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांकडूनच खंडणी उकळली