मुंबई : “मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही” असे ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने याअगोदर पत्राचाळ प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक भांडूपमधल्या मैत्री या निवासस्थानी आज रविवारी (ता.३१) गेले होते. पथकाने सकाळी ७ वाजता वाजल्यापासून चौकशी सुरु केली होती. तब्बल दहा तासाच्या चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, “महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात. या कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. “मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे.
ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”
दरम्यान, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल. असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.