(Pune Crime) पुणे : पुणे शहरातून पोस्ट खात्यातील कोट्यावधी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. उपडाकघरात २७४ गुंतवणुकदारांनी पोस्ट खात्याच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या रुपयांमध्ये खात्यातील पोस्टमास्तरांनीच हेराफेरी करत गुंतवणुक केल्याचे भासवले व त्यावर परस्पर कमिशन घेऊन तब्बल २३ लाख ७६ हजार २१५ रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिघी पोस्ट कार्यालयात हा प्रकार घडला आहे.
विश्रांतवाडी व विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल….!
याप्रकरणी विश्रांतवाडी व विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. दिघी उपडाकघरचे पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी (वय ४०, रा. येवलेवाडी), क्लार्क भगवान श्रीरंग नाईक (वय ३६, रा. दिघी), धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे (वय ३७, रा. धानोरी), धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय ४९,रा. भैरवनगर, धानोरी), रमेश गुलाब भोसले (रा. वानवडी), वि लास एस देठे (वय ५९,रा. वानवडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नानारसाहेब वीर (वय ४२, रा. खडकमाळ आळी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमाचा गैरफायदा घेऊन दिघी पोस्ट कार्यालयात १६ जुलै २०१८ ते २१ ऑगस्ट २०२० दरम्यान दिघी उपडाकघरात २७४ गुंतवणुकदारांनी ९ कोटी ६२ लाख ९८ हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा डाकघर येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी १८ लाख ३५ हजार ११५ रुपये धानोरी डाकघरास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक केली.
विलास देठे हा विमाननगर येथील उपडाकघरात उपडाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने आवर्ती ठेवखाते आणि सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आलेल्यांच्या रक्कम स्वीकारुन त्यांच्या पासबुकवर नोंद करुन त्याची शासकीय फिनाकॅल प्रणाली मध्ये नोंद करायची जबाबदार देठे यांच्यावर होती. त्याने १९ खातेदारांनी आवर्ती ठेव खाते व सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली ४५ हजार ९०० रुपयांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये जमा करता फसवणूक केली.
५९ गुंतवणुकदारांची एकूण २ कोटी ४७ लाख ६० हजार रुपये रक्कम स्वीकारुन त्यांचे बीआरडी डाकघरामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी ४ लाख ९५ हजार २००
रुपये स्वीकारले. त्यातील ७५ टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन २५ टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल रमेश भोसले यांना दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.