पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी राऊतांच्या बंगल्यावर ईडीच्या पथकाने छापेमारी केली होती. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. त्यानंतर, “पण तरीही मी शिवसेना सोडणार नाही.” असं ट्वीट संजय राऊतांनी केलं होतं. दरम्यान राऊतांच्या घरी सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पण अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.
संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्याना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. इतर ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफ तैनात करण्यात आलं आहे.